वृत्त क्रमांक 1116
नाम फाउंडेशन आणि शिवार हेल्पलाइनतर्फे अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक बियाणे वाटप
इतर अशासकीय संस्थांनीही मदतीचा हात पुढे करावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड, दि. 19 ऑक्टोबर:- जिल्ह्यात माहे ऑगस्ट व सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने नाम फाउंडेशन संस्थेने कृषी विभागाच्या समन्वयाने हरभरा पिकाचे 600 व ज्वारी पिकाचे 160 क्विंटल बियाणे मोफत उपलब्ध करून दिले. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी इतर शासकीय संस्थानीही मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, शिवार हेल्पलाइनचे विनायक हेगाणा, नाम फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके, जिल्हा समन्वयक कुंपलवार, समन्वयक दत्तात्रय गरजे, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. गीते (देगलूर), श्री. शिरफुले (नांदेड), तहसीलदार संजय वारकड, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल आणि नांदेड व अर्धापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
हवामान बदलामुळे अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश घटनांमध्ये वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे 86 टक्के क्षेत्र सोयाबीन व कपाशी पिकाखाली असून ही पिके नैसर्गिक आपत्तीला अधिक बळी पडणारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबाग, ऊस, रेशीमशेती आदी अतिवृष्टीला प्रतिकारक पिकांकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
तसेच आपत्ती सौम्यीकरणासाठी पुढील कालावधीत जिल्ह्यातील नदी-नाल्यांचे सरळीकरण व खोलीकरण, जलतारा, विहीर पुनर्भरण, रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी आदी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नदीकाठांवर बांबू लागवड करून पुर नियंत्रणाचे कार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी गटशेतीचा अवलंब करून मजुरी समस्येवर मात करावी. तसेच अशासकीय संस्थांनी सामाजिक जबाबदारी म्हणून शेतकऱ्यांना विविध उपाययोजनांद्वारे मदतीचा हात द्यावा, असेही जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी आवाहन केले.
नाम फाउंडेशनने साधारणतः 95 लाख रुपये किमतीचे हरभरा पिकाचे बियाणे नांदेड जिल्ह्यास पुरवठा केले असून ते गाव पातळीवर कृषी विभागाच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीने बाधित 6 हजार शेतकऱ्यांना प्राधान्याने वाटप करण्यात येणार आहे असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी प्रास्ताविकात सांगितले.
शिवार हेल्पलाइनचे विनायक हेगाणा यांनी सांगितले की, संस्थेमार्फत निविष्ठा स्वरूपात मदत तर केली जातेच, तसेच मानसिक पाठबळही दिले जाते. नैराश्य वा वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांनी शिवार हेल्पलाइनच्या 8955771115 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
नाम फाउंडेशन राजाभाऊ शेळके यांनी सांगितले की, संस्थेमार्फत नांदेड जिल्ह्यातील 41 नाल्यांवर 30 हजारांहून अधिक बांबू लागवड, पूरग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्य किटचे वाटप तसेच शेतात गाळ टाकण्याची कामे सुरू आहेत.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना हरभरा व ज्वारी पिकांचे बियाणे वाटप करण्यात आले. नाम फाउंडेशनने सामाजिक उत्तरदायित्वातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मोफत बियाणे पुरवठा केल्याबद्दल जिल्हाधिकारी महोदयांनी या संस्थेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी सानप, तंत्र अधिकारी राजेश मिरगेवार, तंत्र अधिकारी फलोत्पादन स्वामी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.
000000

.jpeg)



No comments:
Post a Comment