Monday, September 15, 2025

वृत्त क्रमांक 960

राष्ट्रीय लोकअदालतीत नांदेड जिल्ह्यात विक्रमी प्रकरणे निकाली

नांदेड दि. 15 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व सत्र न्यायालय नांदेडच्या प्रांगणात शनिवार 13 सप्टेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हयामध्ये एकुण 5 हजार 54 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून 20 कोटी 24 लाख 16 हजार 512 इतक्या रकमेबाबत विविध प्रकरणात तडजोड झाली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक हे होते. तसेच डॉ. एस.डी. तावशीकर, जिल्हा न्यायाधीश-2, शरद  देशपांडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, अध्यक्ष अभिवक्ता संघ नांदेड व रणजीत देशमुख जिल्हा सरकारी वकील नांदेड, नांदेड येथील सर्व न्यायाधीश उपस्थित होते. 

अध्यक्षीय भाषणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांनी राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित पक्षकारांना लोकअदालतीचे महत्व प्रभावीपणे सांगितले. चित्रपटातील संवादाचा आधार घेतला ‘‘माझ्याकडे गाडी आहे, पैसा आहे, चांगला वकील, पुरावे देखील आहेत तुझ्याकडे काय आहे? यावर समोरच्या पक्षकाराने असे म्हणाले पाहिजे ‘‘माझ्याकडे लोकन्यायालय आहे’’.  त्यामुळे लोकअदालत ही एक संधी असून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित पक्षकारांना केले.

प्रास्ताविकात आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घ्यावीत. कधी-कधी तडजोड करुन शांती मिळवणे गरजेचे असते. लोकन्यायालय ही त्यासाठी संधी असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शरद देशपांडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांनी केले.  

नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका न्यायालयात व कौटुंबिक न्यायालय नांदेड येथे शनिवार 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, धनादेश अनादरीत झालेली प्रकरणे, बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, लोहमार्ग गुन्हा कबुली प्रकरणे, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय येथील प्रलंबीत प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगर पालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे वसुली प्रकरणे, विविध बॅंकांचे तसेच विद्युत प्रकरणे, दूरसंचार विभागाचे टेलिफोन, ट्रॅफिक चालन इत्यादींचे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विषेश मोहिमेअतंर्गत 1184 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

या लोकअदालतीमध्ये जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालत यशस्वी करण्याकरिता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड यांच्या मार्गदर्षनाखाली शरद देशपांडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, मुख्यालयातील व तालुकास्तरावरील सर्व जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश यांनी विषेश प्रयत्न केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये परिश्रम घेतलेल्या सर्व न्यायालयीन कर्मचारीवृंदांचे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करुन यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

0000




No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...