वृत्त क्रमांक 803
महसूल सप्ताह निमित्त तळणी तालुका नांदेड येथे भव्य वृक्ष लागवड कार्यक्रम
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
नांदेड,३ ऑगस्ट:- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान ‘महसूल सप्ताह’ राज्यभर साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 3 ऑगस्ट 2025 रोजी मौजे तळणी (ता. नांदेड) येथे भव्य वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमांतर्गत गावातील पानंद रस्ते व शिव रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 310 विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड मानवी साखळी तयार करून करण्यात आली. या उपक्रमात गावातील नागरिक, शासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येक सहभागी व्यक्तीने स्वतः झाडे लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.
कार्यक्रमाला तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी आडेराघो परिविक्षाधिन तहसीलदार अभयराज नंदुंडे, सुनील माचेवाड, पीएसआय निजाम सय्यद (लिंबगाव पोलीस स्टेशन), बिडकर मॅडम (आरोग्य उपकेंद्र, तळणी) आदी अधिकारी उपस्थित होते.
गावच्या सरपंच श्रीमती वेणूबाई संभाजी सूर्यवंशी, उपसरपंच श्रीमती त्रिशला मारुती सावंत, ग्रामसेवक परतवाड, कृषी सहाय्यक श्रीमती मोरे, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांची उपस्थिती होती.
याशिवाय कार्यक्रमास माजी सरपंच वैजनाथ शंकराव सूर्यवंशी, माजी सरपंच घनश्याम सखाराम सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी बालाजी सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष पंजाबराव सूर्यवंशी यांच्यासह इतर ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रसंगी तहसीलदार संजय वारकड यांनी वृक्ष लागवडीचे पर्यावरणीय, सामाजिक व आरोग्यदायी फायदे स्पष्ट करत, झाडांचे संवर्धन व संरक्षण करण्याचे महत्त्व सांगितले. “फक्त झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संगोपन ही सामूहिक जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
या उपक्रमामुळे तळणी गावात हरित पट्टा तयार होऊन पर्यावरणीय समतोल साधण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांना शाश्वत वारसा मिळवून देण्यासाठी मोलाची भर पडणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
०००००
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment