वृत्त क्र. 770
लिंबूवर्गीय फळे क्षेत्रविस्तार,प्रक्रिया,मूल्यवर्धन संधींचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - विलास शिंदे
सह्याद्री फार्मर प्रोडूसर कंपनी, नाशिक यांचे जिल्हास्तरीय कार्यशाळेत आवाहन
नांदेड, दि. २७ जुलै:- शनिवारी कै.शंकररावजी चव्हाण मुख्य सभागृह,जिल्हा नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कृषी विभाग आणि आत्मामार्फत संत्रा,मोसंबी, कागदी लिंबू या फळांचा क्षेत्र विस्तार प्रक्रिया आणि मूल्यवर्धन संधीबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यशाळेस संपूर्ण जिल्हाभरातून 400 पेक्षा अधिक फळ बागायतदार शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
नांदेड जिल्ह्यात मोसंबी,कागदी लिंबू,संत्रा या पिकाखाली फळबाग लागवड करण्यास असलेला वाव, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून उपलब्ध असलेले अनुदान सहाय्य याविषयी प्रास्ताविकातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी मार्गदर्शन केले. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि नुकत्याच येऊ घातलेल्या कृषी समृद्धी योजनेमधून शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध असलेल्या फळबाग लागवड, पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया संधीविषयी माहिती दिली. तसेच या योजनांचा लाभ प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावातील शेतकरी बांधवांनी एकत्रित येऊन शेतकरी गटे, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणेविषयी तसेच ॲग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत शेतकरी ओळखपत्र प्राप्त करण्याविषयी मार्गदर्शन केले.
सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी,नाशिक विलास शिंदे हे सदर कार्यशाळेस मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले होते. त्यांनी सोयाबीन कपाशी सारखी पारंपारिक पिकांचे अर्थशास्त्र आणि फळे,भाजीपाला,फुल शेती या पिकांचे अर्थशास्त्र व उत्पादनाच्या,उत्पन्नाच्या मूल्यवर्धनाच्या आणि निर्यातीच्या संधीविषयी मार्गदर्शन केले आणि फलोत्पादन पिकांकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वाटचाल करावी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून प्रक्रिया उद्योगांसोबत खरेदी करार करणेविषयी माहिती दिली.
कार्यशाळेचे डॉ. शिंदे, प्रमुख शास्त्रज्ञ,कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांनी कागदी लिंबू,संत्रा,मोसंबीच्या प्रक्रियेस सुयोग्य अशा जातीच्या लागवड प्रयोगाविषयी माहिती दिली. सरते शेवटी शेतकऱ्यांनी या विषयावर विविध प्रश्न आणि शंका विचारून लिंबूवर्गीय फळपीक नवीन वाणांचे लागवड साहित्य, जुन्या फळबाग झाडावर नवीन वाणांचे ग्राफ्टिंग करणे इत्यादी माहिती घेतली.
सदर कार्यशाळेस डॉ.देविकांत देशमुख, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र,पोखरणी कैलास वानखेडे, कृषी उपसंचालक, श्रीमती अर्चना गुंजकर, प्रकल्प संचालक,आत्मा, श्री. रणवीर, उपविभागीय कृषी अधिकारी किनवट, गीते, उपविभागीय कृषी अधिकारी देगलूर, श्री. शिरफुले नोडल अधिकारी,स्मार्ट तथा उपविभागीय कृषी अधिकारी, नांदेड तसेच तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे यशस्वी आयोजनासाठी श्री मिरगेवार, तंत्र अधिकारी आणि आत्माअंतर्गत सर्व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी विशेष परिश्रम घेतले.
०००००

.jpeg)
No comments:
Post a Comment