Wednesday, May 28, 2025

 वृत्त क्रमांक 548

शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापूस बियाणे खरेदी व पेरणी करु नये

नांदेड, दि. 28 मे :- शेतकऱ्यांनी एचटीबीटी कापसाचे बियाणे विकत घेवू नये किंवा पेरणी करू नये. अधिकृत व प्रमाणित कंपन्यांचेच बी.टी. बियाणे खरेदी करावे. शंकास्पद बियाणे विक्रेत्यांची माहिती तात्काळ नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास कळवावी व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

सध्या खरीप हंगाम 2025 ची लगबग सुरु आहे.  ग्रामीण भागात कपाशी लागवडीसाठी बियाणे खरेदीची लगबग सुरु आहे. एचटीबीटी ही एक अनधिकृत जैवतंत्रज्ञान आधारित कापसाची जात आहे. जी अद्याप भारत सरकारकडून अधिकृतपणे मान्यता प्राप्त नाही. एचटीबीटी बियाण्यांचे उत्पादन, विक्री व पेरणी ही अनधिकृत व बेकायदेशीर आहे, असे केल्यास बी.टी. बीज कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा, व अन्य संबंधित कायद्यानुसार गुन्हा ठरतो.

एचटीबीटी बियाण्यांची उत्पत्ती, कार्यक्षमता व परिणाम याबाबत कोणतीही खात्री नाही. रोगप्रतिकारक शक्ती, उत्पादन क्षमता आणि बाजारातील मागणी यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. बोगस व बनावट बियाणे मिळण्याची शक्यता वाढते. राज्य शासन व कृषी विभाग यांच्याकडून याबाबत सातत्याने कारवाई सुरू आहे. अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यां विरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत, अशी माहिती कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

0000

No comments:

Post a Comment