Wednesday, May 21, 2025

वृत्त क्रमांक 519

शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा रास्त भावात

मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती

नांदेड दि. 21 मे : जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 लवकरच सुरु होत असुन, शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणे, खते व किटकनाशके मिळण्यासाठी बाजारात उपलब्ध होणाऱ्या बियाणे, खते व किटकनाशक विक्रेते व उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी नांदेड जिल्हयामध्ये जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुकास्तरावर 16 असे एकुण 17 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

खरीप हंगामामध्ये कृषिसेवा केंद्रचालक किंवा खाजगी एजंटामार्फत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे खते  बियाणे व किटकनाशके शेतकऱ्यांना विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी कृषि विभागाकडुन कृषि सेवा केंद्राची नियमित तपासणी करण्यात येत असते. सर्व निविष्ठांचे व्यवस्थित वाटप व चांगल्या प्रतीच्या निविष्ठा शेतकऱ्यांना मिळतील, शेतकऱ्यांची निविष्ठासाठी अडवणुक होणार नाही यासाठी भरारी पथक काम करणार आहे. त्याचबरोबर कृषि निविष्ठा विक्रीमध्ये गैरव्यवहार, साठेबाजी, ज्यादा दराने विक्री असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास उत्पादक, विक्रेत्यांचे परवाने निलंबित किंवा रद्य करण्यात येतील. तसेच गैरव्यवहाराचे स्वरुप गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा बोगस बियाणे, खते व किटकनाशकांची विक्री केल्यास संबंधिताविरुध्द भरारी पथकामार्फत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर भरारी पथकामध्ये तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती, निरीक्षक वजन व मापे व मंडळ कृषि अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जिल्हास्तरीय भरारी पथकात कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, वजन मापे निरीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे.

मागील वर्षात कृषि विभागामार्फत नांदेड जिल्हयात बोगस खते विक्री केल्यामुळे 03 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चालू वर्षात एक फौजदारी गुन्हा हिमायतनगर येथे दाखल झाला आहे. बियाण्यांची अनधिकृत विक्री केल्यामुळे एका बियाणे उत्पादकावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच अप्रमाणीत बियाण्यांची विक्री केल्यामुळे उत्पादक व कृषि सेवा केंद्रचालक यांच्या विरुध्द 32 न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. येणाऱ्या खरीप हंगामामध्ये मोहिम राबवून रॅडमली कृषि निविष्ठा विक्रेते व उत्पादकांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यामध्ये अनियमितता आढळुन आल्यास संबंधितांचा परवाना निलंबित अथवा रद्य करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही निविष्ठा विक्रेत्यांनी गैरव्यवहार, साठेबाजी, ज्यादा दराने विक्री, बोगस खते बियाणे विक्री करु नये, असे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करताना काही अडचणी येत असतील किंवा विक्रेत्यांकडून अडवणुक होत असेल तर तात्काळ संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 938     दहावी-बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरण्या साठी मुदतवाढ     नांदेड ,   दि.   4 सप...