Tuesday, September 29, 2020

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार

दिनानिमित्त प्रशिक्षण संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त आरटीआय ऑनलाईन व माहिती व तंत्रज्ञानाचा - माहिती अधिकार कायदा अंमलबजावणीत होणारा प्रभाव या विषयावरील प्रशिक्षणाचे आयोजन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने जिल्‍हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली 28 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्‍यात आले होते. यावेळी जिल्‍हा सुचना विज्ञान अधिकारी प्रफुल्‍ल कर्णेवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व प्रथम अपिलीय अधिकारी व जनमाहिती अधिकारी तसेच सहाय्यक जनमाहिती अधिकारी, अधिकारी-कर्मचाऱ्यांना  या विषयावर प्रशिक्षण दिले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) शरद मंडलीक यांनी केले. 

 

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात दिनांक 12 ऑक्टोंबर 2005 पासून लागू करण्‍यात आला आहे. शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचलेल्‍या पावलांमुळे अल्‍पावधीतच राज्‍यात हा कायदा लक्षणीय स्‍वरुपात लोकाभिमुख झाला आहे. महाराष्‍ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायदयाच्‍या व्‍यापक प्रसिध्‍दी  व प्रभावी अमंलबाजावणीसाठी शासन स्‍तरावरून सर्वतोपरी उपयायोजना करण्‍यात येतात. 28 सप्‍टेंबर हा दिवस आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर माहिती अधिकार दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम या कायदयातील तरतुदी आणि कार्यपध्‍दती, विविध दृकश्राव्‍य माध्‍यमातून व्‍यापक प्रसिध्‍दी देवून व विविध उपक्रम राबवून त्‍या जास्‍तीतजास्‍त नागरिकांपर्यत पोहचविण्‍याचा शासनाचा मानस आहे. यास्‍तव प्रतिवर्षी 28 सप्‍टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्‍हणून राज्‍यभर साजरा करण्‍यात यावा असे शासनाचे निर्देश आहेत.

 

माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायदयाच्‍या व्‍यापक प्रसिद्धी व प्रभावी अंमलबजावणीसाठी आरटीआय ऑनलाइन प्रणालीचा वापर प्रशासनाच्‍या कारभारात कसा करावा यावा याविषयी माहिती देण्‍यात आली आहे. शासनाकडून आरटीआय ऑनलाईन प्रणाली जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड, महानगरपालीका, पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड, जिल्‍हा परिषद नांदेड या कार्यालयात कार्यान्वित करण्‍यात आली आहे.    आरटीआय ऑनलाइन ही सुविधा https://rtionline.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. त्‍यानुसार नागरिकांनी या ऑनलाईन प्रणालीद्वारे माहिती अधिकार अर्ज व अपिल दाखल करु शकतात.  नांदेड जिल्‍हा संकेतस्‍थळ www.nanded.gov.in या वेबसाईटवर माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4 अन्‍वये प्रत्‍येक कार्यालयनिहाय, सर्वकार्यासन प्रमुख, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार कार्यालयाची 1 ते 17 मुद्यांची माहिती संकेतस्‍थळावर प्रसिद्ध केली आहे. त्‍यानुसार नागरिकास ही माहिती सहज उपलब्‍ध होऊ शकते. या प्रशिक्षणास सर्व प्रथम अपिलीय अधिकारी व जन माहिती अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी व आरटीआय संकेतस्‍थळाचे कामकाज हाताळणारे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकाचे निरसन करून तहसिलदार (सामान्‍य) प्रसाद कुलकर्णी यांनी उपस्थितांचे शेवटी आभार मानले.

00000


No comments:

Post a Comment

  ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार मुंबई, दि.२८...